आस्तिकता, धर्म, संस्कृती संरक्षणाचे दायित्व ब्राह्मण आणि ब्राह्मण सदृश तदितर समाज यांच्यावर आहे. प्रचाराची सगळी साधने, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, मासिके, शालेय शिक्षण, हे सगळे प्रतिकूल आहे. बहुजन जे आप्त आहेत, तेही आजच्या पश्चिमी लाटेच्या विचारप्रवाहात वहाणारे आहेत. आज कुणीच शास्त्रशुद्ध विचार ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. आपण एकाकी आहोत. आज आमचा धर्म आणि संस्कृती यांवर असे प्रचंड आघात होत आहेत, अशा लाटा उसळत आहेत की, आमच्याही मनाचा तोल बिघडावा, कधी इकडे वळावा, तर कधी तिकडे झुकावा. सर्व व्यवस्था कोलमडणारी असा हा विलक्षण विप्लवाचा काळ आहे. अशा अवस्थेत आमच्या वैदिक धर्मरक्षणाचे गुंतागुंतीचे अन् बिकट कार्य आमच्या वाट्याला आलेले आहे. वैदिक धर्म जटिल आहे; कारण त्यात आध्यात्मिक अंश तर आहेच, शिवाय आधिदैविकही आहे. ही दोन्ही अंगे आमच्या आचार-विचारांतून नित्य प्रगटणारी आहेत. हे जटिल काम खांद्यावर घेऊन `सत्त्वरक्षण’ करण्याचे दायित्व आमच्यावर आहे. इथे टाळ्या नाहीत, हार तुरे, तर नाहीच नाहीत, तरीही अविचल राहून बिना गाजावाजा नव्या पिढीकडे आपले विचारधन पोहोचवण्याचे कार्य आम्हाला करायचे आहे. मान, सन्मान, पारितोषिके, एषणा, वर्णाचा अभिनिवेश, द्वेष, असूया, तिरस्कार, असे कोणतेच विकार जवळपास फिरकू न देता हे कार्य करायचे आहे. ईश्वरशरण, शास्त्रशरण आणि बुद्धी राखून हे धर्मकार्य करायचे आहे. हाच ज्ञानदेवांपासून ते महिपता, श्रीधरांपर्यत सर्व संतांची धर्मरक्षण्याची आटापिटा आहे. हेच धर्मसंस्थापन आहे.
***************************
‘पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांच्यात एकदा ‘श्रेष्ठ कोण ?’ यावरून संघर्ष झाला. प्रत्येक जण म्हणायचा, ‘मीच श्रेष्ठ !’ माझाच या देहाला आधार आहे. माझ्याविना देह जगूच शकत नाही. मी आहे; म्हणूनच देह कार्यक्षम आहे.’ मग क्रमाक्रमाने एक एक इंद्रिय निघून गेले. डोळा गेला; पण डोळ्यांविना काही अडले नाही. कोणत्याच इंद्रियाविना शरिराचे अडले नाही. मग प्राण पुढे आला. तो म्हणाला, ‘माझ्यामुळे तुम्हा इंद्रियांचे जीवन आहे’ आणि तो देह सोडून जाऊ लागला. सगळी इंद्रिये मृतवत होऊ लागली. ‘प्राणाविना आपण नसल्यासारखेच आहोत, हे इंद्रियांच्या ध्यानी आले. मग त्यांनी प्राणांची स्तुती केली, ‘हे प्राणदेवा, तूच या देहाचे सर्वस्व आहेस. तुझ्या शक्तीमुळेच सर्व इंद्रिये आपापली कामे करू शकतात. तू आहेस म्हणून वाणी बोलते, कान ऐकतात, डोळे पहातात, रसनेला रस चाखता येतो, त्वचेला स्पर्शज्ञान होते, हात काम करू शकतात, पाय चालतात, शौच, लघुशंका आदी कर्मे तुझ्यामुळेच घडतात. तूच अग्नी होऊन उष्णता देतोस. सूर्य होऊन प्रकाश देतोस. पर्जन्य तूच आहेस. वायू, तेज, पृथ्वी तूच. अमृतही तूच. तुझ्यामुळे या सर्वांना प्रतिभा आहे. तूच प्रजापति आहेस. तू गर्भातून संचार करतोस, तेव्हाच नवा जन्म होतो. हे प्राणदेवा, तूच देवराज इंद्र आहेस. विश्व पालन करणारा विष्णु आहेस. अंतरिक्षातला सूर्य तूच आहेस. तूच सनातन आहेस. तू जाऊ नकोस. आमचे रक्षण कर. तुझे गुणगान गात आम्ही राहू. आम्हाला प्रज्ञा दे. आम्हाला आमचे सामर्थ्य परत दे. आम्ही तुला शरण आहोत.’ प्राण संतुष्ट झाला आणि परत आला. देह पुन्हा पूर्वीप्रमाणेच सक्षम झाला.’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ७।४.२०११)