जसे बीज उगवते, वृक्ष होतो, सूर्य उगवतो, मावळतो. भूकंप होतात, सागर मर्यादा धरतो, वायू वाहतो, मृत्यू धावाधाव करतो, या सर्व कार्यांचा कोणी 'कर्ता' असलाच पाहिजे. नास्तिक हा टेबल-खूर्ची बनवणारा सुतार अवश्य आहे, असे सांगतो. पण, वृक्ष पहाड, महासागर बनविणारा कुणी कर्ता मानलाच पाहिजे असे नाही, असे म्हणतो. त्याची आवश्यकता अपरिहार्य आहे, असे मानत नाही.
विश्वाचे सगळे कार्य दोन प्रकारचे आहे. एक 'मानव कृत' व दुसरे 'अमानवी' दोन्ही प्रकारच्या कार्याचे 'कारण' (Cause) आहेच. अनुमान प्रमाण स्वीकारल्याविना आस्तिक नास्तिकच काय पण पशूंची देखील प्रवृत्ती व्हायची नाही. अनुमान न मानले तर प्रत्यक्षही निरर्थक होते. या अनुमानाच्या आधारावरच मानव करू शकणार नाही, असे अद्भुत विश्व, त्या विश्वातील अनंत चेतन अचेतानांची कर्मे, आदींचा कर्ता असलाच पाहिजे, हे सिद्ध होते. सुताराविना टेबल खुर्च्या होऊ शकत नाहीत, कुंभाराविना मडके होत नाही, तर मग त्या परमात्मशक्तीविना, त्या अनंत चेतन शक्तीविना चंद्र, सूर्य, पर्वत, नद्या आदी काहीही होऊ शकत नाही. ज्ञान, इच्छा, आणि क्रियाशक्ती असल्याविना 'कार्य' घडत नाही. ज्ञानाविना इच्छा नाही. इच्छेविना कार्य नाही. जिथे ज्ञान आहे, इच्छा आहे आणि क्रिया आहे, तेथे कर्ता असतोच. प्रत्येक कार्याला कर्त्याची अपेक्षा असतेच. प्रत्यक्ष ज्ञान आणि इच्छा दिसत नाही आणि 'कार्य' दिसते. कमळ पहिले की, विचार येतोच की, हे सुंदर कमळ कुणाच्या तरी ज्ञान व इच्छाक्रियेने निर्माण झाले असले पाहिजे, तसेच या विश्वाचे कारण आहे.