१. परदेशातील वेदांताच्या झंझावाती प्रचाराने धर्मांतराला आळा बसणे !
‘स्वामी विवेकानंदांच्या काळात भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी संस्कृती यांचा प्रभाव, खिश्चन धर्मगुरूंचे बुद्धीभेद करणारे डावपेच, तशा प्रकारचे वाङ्मय, यांमुळे हिंदू धर्म अन् संस्कृती अत्यंत हीन, अमानुष, दयनीय आणि रानटी आहे, असा हीनगंड भारतातील श्रेष्ठ लोकांत जोपासला गेला. पुष्कळशा हिंदूंनी बाप्तिस्माच घेतला असता आणि त्यांचे खिश्चनीकरण झाले असते. स्वामी विवेकानंदाच्या परदेशातील वेदांताच्या तुफानी प्रचाराने त्याला आळा बसला, यात संशय नाही.’
२. जगाला आत्मिक ऐक्याचा संदेश देणे आणि तरुणांमध्ये नवचेतना निर्माण करणे
खिस्ताब्द १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारताचे आणि पर्यायाने हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व केले. या परिषदेमध्ये त्यांनी आत्मिक ऐक्याचा संदेश जगाला दिला. भारताच्या आत्मिक प्रगतीसह ऐहिक प्रगती होणेही तितकेच आवश्यक आहे, या गोष्टीवरही त्यांनी भर दिला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तरुणांमध्ये नवचेतना आणि उत्साह निर्माण होण्यास साहाय्य झाले.
३. आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनमानसात उत्साह आणि देशप्रेम जागृत करणे
सततची परकीय आक्रमणे, अनाचार, लूटमार, स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि हिंसा या सर्वांमुळे हिंदु समाज आक्रांत झाला होता. समाजात निर्माण झालेले औदासीन्य आणि पराभूत मानसिकता यांतून हिंदु समाजाला बाहेर काढण्यासाठी रामकृष्णांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी आसेतुहिमाचल प्रवास केला. आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनमानसात उत्साह आणि देशप्रेम जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले. इतकेच नव्हे, तर हिंदु धर्म आणि हिंदुस्थान यांचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले.
४. ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना
आपल्या गुरूंचा ‘स्नेहयुक्त बंधुभाव आणि आत्मिक ऐक्य’ हा संदेश जगाला देता यावा, यासाठी स्वामी विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली अन् हिंदु धर्माचे खरे स्वरूप जगाला उलगडून दाखवले. या संस्थेच्या कार्याच्या माध्यमातून श्री रामकृष्ण परमहंसांचा संदेश जगात पोहोचवण्याचे स्वामी विवेकानंदांनी आरंभलेले कार्य आजतागायत अविरतपणे चालू आहे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २८ सप्टेंबर २००६, अंक ३७)
No comments:
Post a Comment