श्रीरामप्रभूच्या रघुवंशाची ही कथा विख्यात आहे. रघुवंशातील तो थोर राजा दिलीप ! चक्रवर्ती सम्राट दिलीप गोव्रत आचरतो. त्याच्या पूजनीय अशा नंदीनी गाईला कोवळे गवत खायला देतो. तिची पाठ व मान खाजवितो. तिच्या अंगावर बसलेले डास उडवून लावतो. कुलगुरु वसिष्ठांच्या न थांबणार्या त्या नंदिनी गायीच्या पाठोपाठ छायेसारखा असतो. गाय बसली की, तो बसतो. गाय चालायला लागली की, तो चालू लागतो. एक दिवस त्या अरण्यात एक महाकाय, महाक्रूर सिंह राजासमोर उभा रहातो. त्या नंदिनी गायीला खायला तो सिद्ध असतो. राजा धनुष्य सज्ज करतो. सिंह म्हणतो, `तुझा देह दिलास, तरच मी गायीला सोडीन! ही एकच शर्थ आहे.’ राजा दिलीप सम्राट आहे तरुण, सुंदर, शक्तीमान व कांतीमान आहे. प्रजेचा पालनकर्ता, रक्षणकर्ता आहे. प्रजेचा आधार आहे. गोरक्षणाकरिता स्वदेह तृणवत् मानून सिंहाला द्यायला तयार होऊन उद्गारतो, `गोरक्षा हेच माझ जीवितकार्य! गाय सोडून का परत जाऊ ? अपकीर्तीने लडबडलेला देह राजधानीला परत नेण्यापेक्षा मृत्यू फार फार चांगला. मी क्षत्रिय आहे. क्षतांचे तारण करणारा तोच क्षत्रिय !’
राजा सिंहाला पुढे सांगतो, `सिंहराज, तुला माझी कणव येते. ‘क्षुद्र गायीच्या मोबदल्यात सम्राटाचा देह ! हा राजा मूर्ख असला पाहिजे’, असे तू म्हणतोस. माझ्या शरीराचा व माझ्या जीवनाचा तुला कळवळा येतो. त्यापेक्षा माझ्या यशरूपी शरीराचे रक्षण का करत नाहीस ? कृपाच करायची, तर माझ्या यशरूपी कायेवर कर. या दृश्य, अन्नमय, जड व क्षुद्र देहाची करुणा करायचे कारण नाही. माझ्या साक्षीने व माझ्या डोळ्यांदेखत नंदिनीची हत्या झाली, तर रघुवंशाची कीर्ती कलंकित होईल. माझ्यावर करुणाच करायची असेल, तर माझा देह भक्षण कर आणि नंदिनीला मुक्त कर. त्यामुळे माझी यशरूपी काया चिरंतन राहील.’’
रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, गायीकरिता तारुण्याने मुसमुसलेल्या स्वशरीराची आहुती द्यायला तत्पर असतो ! सागरापर्यंतच्या सर्व भूमीचा एकमात्र स्वामी, सार्वभौम, हाती घेतलेले कार्य तडीला नेणारा, स्वर्गापर्यंत रथातून यात्रा करणारा, देवराज इंद्राचा सहकारी, क्षत्रियाला योग्य असे विधीनुसार अग्नीहोत्र करणारा, याचकांचे मनोरथ आदरपूर्वक पुरवणारा, अपराध्याला योग्य शासन करणारा, वेळेवर निजणारा, वेळेवर उठणारा, देण्याकरिता-त्यागाकरिताच धन संपादन करणारा, मुखातून असत्य बाहेर पडू नये; म्हणून अत्यंत मोजकेच बोलणारा, विजयेच्छू, ततीकरिताच विवाह करणारा, उत्तरायुष्यात मुनीसारखे वानप्रस्थी जीवन जगणारा आणि अखेरीला योगाभ्यासाने शरीराची खोळ बाजूला सारणारा असा हा भारताचा सार्वभौम सम्राट दिलीप !’
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २६.१.२००६, वर्ष पहिले, अंक ८)
No comments:
Post a Comment