यज्ञसंस्थेकरिता वेद अवतरलेत. मंत्रमय वेदरक्षणाकरिता चातुर्वर्ण्यं!
यज्ञसंस्था व वेद चातुर्वर्णाचे ह्रदय, वेदांतल्या वेदमंत्राइतके परम सखोल व परमशास्त्रीय चिंतन जगात अन्यत्र नाही. प्रत्येक वेदमंत्राला देवता आहे. द्रष्टा आहे आणि छंद! शिवाय आहे स्वरचना आणि त्यातील विविधता, वैचित्र्य!
कशी होते शब्दनिर्मिती? कोणत्या अंत:शक्तीशी त्याचा कसा संपर्क येतो? मानवाच्या जीवन परिवर्तनाला, उत्क्रांतीला त्यातल्या कोणत्या शक्तीचा कसा उपयोग करून घ्यायचा हे सगळे कसे intact आहे. हा सगळा प्रपंच अपूर्व आणि आगळा!
या सगळ्या श्रेष्ठतम परामोदात्त प्रयोजनाच्या अंतरी शिरून, त्यांचे परीशोधन करून, विश्वकल्याण साधायचे का यज्ञसंस्था, वेद, वर्णव्यवस्था उखडून टाकण्याकरिता सत्ता, शक्ती, संपत्ती, प्रज्ञा वेचायची?
विश्वाचा कणा उखडून टाकायचा?
हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायचे?
वेदमंत्र हे 'मंत्र' आहेत. इतर शब्दांसारखे सामान्य नाहीत. विशेष आहेत. त्यांतील विशेष आनुपूर्वी ही परम मोलाची चीज आहे. वेदमंत्रांनीच सृष्टी निर्मिली, रचली, आणि घडली आहे.
वेद म्हणजे अक्षर ब्रह्म! सगुण परमात्मा! विशिष्ट आनुपूर्वी राखून, परंपरेनुसार केवळ वेदपठणाने, विश्वकल्याण करणारा हा अपूर्व विश्वातला श्रेष्ठतम निधी, रक्षण करण्याकरिता तन, मन, धन पणाला लावणे, हेच आजचे एकमेव कर्तव्य आहे. हा अनमोल निधी रक्षण्याकरिताच विशिष्ट वर्णरचना, वर्णव्यवस्था निर्माण झाली. तेच चातुर्वर्ण्य! इथे कसला उच्च-नीच भाव? इथे आजचे श्रेष्ठ कानिष्ठतेचे निकष लावणे खुळेपणाचे नाही का? वेदरक्षणाकरिता निर्माण झालेल्या चातुर्वर्ण्याला पर्याय होईल अशी कोणतीच शास्त्रशुध्द रचना आज जगाजवळ नाही.
मग हातचे सोडून पळत्याच्या मागे का धावता?
-प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
संदर्भ: साप्ताहिक सनातन चिंतन (वर्ष ७ अंक ३०)
No comments:
Post a Comment