पर्जन्यमापनासाठी आपण आज जशी साधने वापरतो, तशी पूर्वी काही योजना होती. सृष्टीज्ञानाच्या नानाविध शाखांवर ग्रंथलेखन करणारे ६ व्या शतकातील महान शास्त्रज्ञ वराहमिहिर यांनी पुढील प्रयोग सांगितला आहे. (बृहद्संहिता २३/२) एक अरत्नी मानाचे, म्हणजे १८ इंच व्यासाचे एक कुंड ठेवायचे. त्या कुंडाला ‘मागधमान म्हणतात. हे कुंड आंब्याच्या झाडाचे करतात. हे कुंड १२ अंगुले, म्हणजे ९ इंच उंच, लांब आणि रुंद असे असते.
चाणक्यानेदेखील त्याच्या ग्रंथात विशिष्ट ढगांची माहिती दिली आहे. ढगांचे प्रकार, पाऊस पाडणारे ढग, सूर्य, गुरु आणि शुक्र यांचे स्थान अन् गती यांवरून कोणते ढग वर्षाव करतील, ते दिले आहे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात १४३ प्रकारच्या ढगांचा निर्देश आहे. त्यांतील तीन प्रकारचे ढग हत्तीच्या सोंडेसारखे आणि मुसळधार पावसाचा वर्षाव सतत ७ दिवसांपर्यंत करतात. ८० प्रकारचे ढग केवळ सिंचन करतात आणि ६० प्रकारचे ढग केवळ सूर्यप्रकाशातच प्रकटतात.
यांच्या बृहत्संहितेतील २१ ते २८ या अध्यायांत वर्षाकालाविषयी शास्त्रीय माहिती आहे. प्रारंभी वराहमिहिर म्हणतात, ‘अन्न हे वर्षाकालावर अवलंबून असून ते जगताचा प्राण आहे. त्यासाठी वर्षाकालाविषयी प्रयत्नपूर्वक ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी काही महिने मेघ उत्पन्न होण्याची प्रक्रिया चालू होते. तिला ‘गर्भधारणा म्हणतात. चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रांत प्रविष्ट झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात गर्भधारणेची लक्षणे स्पष्ट दिसतात. गर्भधारणेनंतर साडे सहा महिन्यांनी प्रसव होतो, म्हणजे मेघ जलवर्षाव करतात. (बृहद्संहिता २१-७) उत्तर किंवा पूर्व दिशांकडून शीतल वायू, निर्मळ आकाश, विविध रंगांचे ढग, मंद मेघगर्जना आणि पक्ष्यांचा मधुर ध्वनी अशी गर्भपुष्टीची लक्षणे आचार्य वराहमिहिराने सांगितली आहेत.
विपुल
वृष्टी करणारे मेघ कोणते आणि ते कसे असतात, हे वराहमिहिर यांनी
बृहद्संहितेत सांगितले आहे. त्याने आवर्तमेघ, संवर्तमेघ, पुष्करमेघ आणि
द्रोणमेघ, असे मेघाचे चार प्रकार सांगितले.१. आवर्तमेघ : हे एखाद्या विशिष्ट स्थळी वृष्टी करतात.
२. संवर्तमेघ : हे सर्वत्र वृष्टी करतात.
३. पुष्करमेघ : हे अल्पवृष्टी करतात.
४. द्रोणमेघ : हे अती विपुलवृष्टी करतात.
उल्कापात, अग्नीपात, धुलीवर्षाव, भूकंप व इंद्रधनुष, असे उत्पात आणि ते दिसले, तर ‘गर्भाचा उपघात होतो, असे त्याने बृहद्संहितेत सांगितले आहे. (बृहद्संहिता २१/ २५-२७)
वराहमिहिराने पावसाच्या संदर्भात एक प्रयोग सांगितला आहे. आषाढ महिन्याच्या कृष्णपक्षात चंद्राने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला की, एक ब्राह्मण गावाच्या उत्तरेला वा पूर्वेला जात असे. तो तीन दिवस उपवास करून विराट श्रीविष्णूची प्रार्थना करीत असे. तो जमिनीवर ग्रह-नक्षत्रांच्या आकृत्या काढून श्रीविष्णूची पूजा करीत असे. नंतर चार दिशांना चार कलश मांडून ठेवीत असे. उत्तरेचा कलश श्रावण महिन्याचे, पूर्वेचा कलश भाद्रपद महिन्याचे, दक्षिणेचा कलश आश्विन महिन्याचे आणि पश्चिमेचा कलश कार्तिक महिन्याचे प्रतीक होत. जो कलश पाण्याने भरून जाईल, त्या महिन्यात हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडेल, असे समजले जायचे. हे संकेत खरे ठरायचे आणि अशा पुरुषांचा समाजात नेहमी गौरव होत असे.
ऋषिस्मृति - २, आचार्य वराहमिहिर, प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी)