आमची भूमिका !

सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या विध्वंसनाचे कार्य करणारे खिस्ती आणि इस्लाम यांसारखे धर्म, अर्थ आणि काम यांवर केंद्रित पाश्चात्त्य जीवनरहाटी असणार्‍या विध्वंसकाचे हात बळकट करणारे आपल्या देशातील जे निधर्मी, पुरोगामी आहेत, त्यांचा आधी बंदोबस्त करावा लागेल. बाहेरच्या शत्रूशी केव्हाही लढता येईल; परंतु घरातील या चेकाळणार्‍या शत्रूचे काय ? आधी घरातील विंचू मारा, मग उंबरठ्यावरील सापाला ठेचा. ‘हिंदूंच्या मनावर हे बिंबवणे’, हेच या लेखांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

Wednesday, June 15, 2011

वेदप्रकटदिनाच्या निमित्ताने...

वेदांविषयी मॅक्सम्युलरसहित अनेक पाश्चात्त्य संशोधकांनी पुष्कळ अपप्रचार केले आहेत. काही भारतीय आंग्लाळलेले विद्वानही त्यांचीच री ओढतात; परंतु ज्या सिद्धांतांच्या आधारावर पाश्चात्त्यांनी हा अपप्रचार केला, शेवटी ते सिद्धांत चुकीचे असल्याचे मॅक्सम्युलरनेच मान्य केले आहे.गेल्या दोन शतकांपासून आम्ही भारतीय हिंदुस्थानचा इतिहास आणि वेदादी शास्त्रे, त्यांतील प्रसंग अन् घटना पाश्चात्त्यांच्या भिंगामधून (prism) पहात आहोत. पाश्चात्त्यांचे चिंतन, त्यांची जीवनरहाटी, आचार-विचार आणि त्यांच्या संशोधनाच्या चौकटी यांतून आम्ही वेदादी वाङ्मय, आमच्या परंपरा, आमचा इतिहास अन् आमची जीवनरहाटी यांकडे पहातो आहोत. त्या चौकटीत आमची संस्कृती बसवतो. आमच्या इंग्रजी शिक्षित लोकांवर पाश्चात्त्य संस्कृतीचा विलक्षण प्रभाव आहे. जोवर आम्ही ही पाश्चात्त्यांनी घडवलेली, त्यांच्या धारणेची, चिंतनपद्धतीची चौकट आणि ते भिंग (prism) दूर सारीत नाही, तोवर आम्हाला वेदादी शास्त्रे कधीच कळणार नाहीत. फ्रान्सिस गौतिए (Francis Gautier ) हा श्रेष्ठ फ्रेच विचारवंत सांगतो, ‘पाश्चात्त्य चिंतनाने ज्या चौकटी निर्माण केल्या, त्या साच्यात आम्ही वेदादी वाङ्मय बसवतो. त्या उपनेत्रातून (चष्म्यातून) आमच्या पवित्र धर्मग्रंथांकडे पहातो. आम्ही ते दूषित, किळसवाणे, मलीन उपनेत्र फेकून दिले पाहिजे. त्याविना आम्हाला आमचा सनातन धर्म आणि संस्कृती, हिंदुस्थान अन् हे जग कळणार नाही.’’ यामुळेच सामान्य जनतेचा केलेला बुद्धीभ्रम दूर करण्यासाठी पाश्चात्त्य संशोधकांचे अपप्रचार आणि त्यांचा सूत्रबद्ध प्रतिवाद पुढे देत आहोत.
म्हणे, वेद हे पौरुषेय असून अलीकडच्या काळातील आहेत !

टीका
अ. वेद अती प्राचीन आहेत; म्हणून वेदांचा कालनिर्णय ठरवणे असंभव आहे. यास्तव भारतीय पंडितांनी वेदांना अपौरुषेय म्हटले.
आ. ‘वेदांच्या रचनेचा काळ इ.स. पूर्वी दीड सहस्त्र वर्षे प्रारंभ झाला आणि इ.स.नंतर ५०० वर्षांपर्यंत त्यांची रचना पूर्ण झाली !’ - मॅक्सम्यूलर
इ. ‘वेद अलीकडचे आहेत.’ - बेवर, मॅकडॉनल्ड, फौलर, विल्सन असे पाश्चात्त्य आणि आमचे भांडारकर प्रणालीचे आंग्लाळलेले रा.ना. दांडेकर इत्यादी वेदसंशोधक
ई. वेद हे मानवकृत आहेत, अलीकडचे आहेत आणि निरनिराळ्या लोकांनी ते निर्माण केले आहेत.
उ. ‘वेद अनादी, अनंत नाहीत. वेद अपौरुषेयही नाहीत.’ - डॉ. कैलाशचंद्र, डॉ. पी.व्ही. काणे (History of Dharma-Shastra’), स्वामी दयानंद इत्यादी
ऊ. ‘येशूच्या जन्माच्या ३ सहस्त्र वर्षे आधी वेद झाले आहेत.’ - पाश्चात्त्य वेद संशोधक पंडित (scholars)

खंडण
१. वेदांचे अपौरुषीयत्व
अ. ‘शास्त्रयोनित्वात्’ (ब्रह्मसूत्र, अध्याय १ पाद १ सूत्र ३) हे ब्रह्मसूत्र आहे. भगवान व्यास या सूत्रात निःसंदिग्ध सांगतात, ‘परमात्म्यापासून वेदांची उत्पत्ती झाली.’ शंकराचार्यांनीही या सूत्रावर भाष्य केले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे महाभूतांचे निःश्वास आहेत, अशा अर्थाच्या बृहदारण्यक श्रुती आहेत. जैमिनी प्रभृती आस्तिक दर्शनकार आणि आदिशंकर भगवत्पादही ‘वेद स्वयंभू आहेत’, हे ठासून सांगतात.’

आ. ‘वेदाच्या अपौरुषीयत्वाचा सिद्धांत ‘मीमांसा दर्शना’ने र्निविवाद मांडला. वेदाच्या अपौरुषीयत्वाविषयीच्या वादात जे पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष झाले, त्यावर शेकडोंनी ग्रंथ आहेत. पाश्चात्त्य प्रणालीतून अध्ययन केलेल्या लोकांना ते युक्तीवाद समजत नाहीत. मीमांसा दर्शनाप्रमाणेच न्याय, वैशेषिक इत्यादी आस्तिक दर्शने आहेत. त्यांनुसार ‘वेद काही असंबद्ध चिंतन नाही किंवा ती शब्दरचना असंबद्ध नाही, तर वेदातील ऋचा या अर्थपूर्ण आहेत आणि वेदरचनाही अर्थपूर्ण आहे’; परंतु यावरून वेद मानवर्निमित आहेत, असे म्हणणे अयोग्यच आहे; कारण वेदात असलेले धर्म आणि ब्रह्म यांविषयींचे अतर्क्य ज्ञान मानव सांगू शकत नाही. ते मानवाची इंद्रिये आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. अलौकिक अतर्क्य ज्ञानाचा उगम अलौकिक अशा कारणांपासूनच होण्याची संभावना आहे; म्हणून असंख्य समर्पक युक्तीवाद देऊन मीमांसा दर्शनाने निराबाध, र्निविवाद सिद्ध केले आहे की, वेद ईश्वरर्निमितही नाहीत, तर ते स्वयंभू आहेत, अनादी आणि अनंत आहेत. मीमांसा दर्शनाने वेदाच्या अपौरुषीयत्वाविषयी असंख्य अकुंठित करणारे युक्तीवाद दिले आहेत.

इ. नारायण तत्त्वातून सृष्टी निर्मितीसाठी (श्रीविष्णूच्या) नाभीतून ब्रह्मदेव निर्माण झाला. आपली उत्पत्ती आणि आपले कार्य यांविषयी ब्रह्मदेवाला संभ्रम निर्माण झाल्याने, ते जाणून घेण्यासाठी त्याने तपःश्चर्या केली अन् तो सूक्ष्मरूपाने (नाळेच्या) कमळदंडाद्वारे नारायण (श्रीकृष्ण) तत्त्वाजवळ आला. त्या वेळी मनःसंकल्पातून जे त्याला मिळाले, तेच वेद ज्ञान आहे; म्हणूनच वेदांना अपौरुषेय म्हटले आहे. भगवंताकडून प्राप्त झालेले स्वयंभू असे वेदांचे ज्ञान ऋषींना तपश्चर्येनंतर ब्रह्मदेवाकडून प्राप्त झाले. त्याचा वारसा अनेक ऋषींच्या अनेक पिढ्यांनी (ध्यानात) आपल्या अनुभूतीतून पाहिलेल्या ऋचांच्या रूपात संग्रहित केला. नंतर पुढील पिढ्यांनी तो मुखोद्गत करून नंतरच्या पिढ्यांना दिला. त्या ऋचा त्यांच्या शुद्ध मूल रूपात स्मरणात रहाव्यात म्हणून क्रमपाठ, जटापाठ, तसेच घनपाठ या पाठांतराच्या आश्चर्यकारक पद्धती आणि पठणात भेद होऊ नये म्हणून स्वरांचे उदात्त, स्वरित आणि अनुदात्त उच्चार निर्माण करून भारतियांनी आजतागायत वेद मूळ स्वरूपात जतन केले आहेत. वेदांच्या अपौरुषेयाविषयी पुराव्यास्तव अनेक ऋचांपैकी एक ऋचा पुढे दिली आहे.

बृहस्पते प्रथमं वाचो अग्रं यत्प्रैरत नामधेयं दधानाः ।
यदेषां श्रेष्ठं यदरिप्रमासीत् प्रेणा तदेषां निहितं गुहाविः ।।
(ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त ७१ ऋचा १)
यामध्ये शब्द ब्रह्मज्ञान ब्रह्माद्वारे ऋषींना कसे झाले, ते सांगितले आहे. बृहस्पतीच्या वाणीचा जो अग्र, म्हणजे श्रेष्ठ अंश सृष्टीच्या आरंभी प्रेरित (प्रकट) झाला. त्या ज्ञानरूप वेदाचा श्रेष्ठ आणि उत्तम भाग ऋषींच्या हृदयरूपी गुहेत स्थापित झाला, म्हणजेच ऋषींना त्याचा अर्थबोध झाला. ‘उक्तं तु शब्दपूर्वत्वम् ।’(१.१.२९), म्हणजे (वेदांचे) हे शब्द नवीन नसून ते अगोदरच भगवंताकडून सांगण्यात आले आहेत. नंतर ते केवळ ऋषींद्वारा प्रकट झाले. हे जैमिनीचे सूत्र आहे. या वरचे शाबरभाष्यही आहे. त्यातही तेच निर्वचन आहे.’ म्हणून वेद अपौरुषेय आहेत.’

ई. अभिन्न निमित्त उपादान कारण : ‘वेद (मूळ नाद) सृष्टीचे उपादान कारण आहेत. माया आकाशाचे उपादान कारण. आकाश वायूचे, वायू तेजाचे उपादान कारण, तेज जलाचे, जल पृथ्वीचे उपादान कारण आहे ! कोळी कीडा जाळे स्वतःतून निर्माण करतो. स्वतःत खेचून घेतो. कोळी कीडा हा अभिन्न निमित्त, उपादान कारण दोन्ही आहे. तसे वेदांचे आहे.’

उ. ‘संस्कृत भाषेच्या वरवरच्या ज्ञानावर विसंबून हे पाश्चात्त्य पंडित स्वतःला संशोधक आणि विद्वान म्हणून मिरवतात. आपल्या अल्पमतीवर भार देऊन वेदांविषयी मनमानेल ती वक्तव्ये करतात. त्यावर कडी म्हणजे आंग्लाळलेले भारतीय पंडित त्यांचीच री ओढतात. अशा या पढत मूर्खांच्या मतांचे मोल ते किती असणार ? यावरून ‘वेद अतीप्राचीन असल्यामुळे वेदांचा कालनिर्णय ठरवणे असंभव आहे; म्हणून भारतीय पंडितांनी वेदांना अपौरुषेय ठरवले’, असे टिकाकारांनी म्हणणे, हे त्यांच्या अल्पमतीचे आणि अडाणीपणाचे लक्षण आहे. (श्रीगणेश अध्यात्म दर्शन, पृष्ठ क्र. ३२६,३२७)
तसेच वेदांचे कर्ते जर कुणी मानव असते, तर या लक्षावधी वर्षांच्या वेदांच्या परंपरेत त्यांचे नाव लोकांना कळले असते. बौद्ध ग्रंथाचा कर्ता बुद्ध, महाभारतकर्ते व्यास, मनुस्मृतीचा कर्ता मनु, गीतेचा कर्ता श्रीकृष्ण, ही ग्रंथकर्त्यांची नावे दीर्घकाळापासून लोकांना ठाऊक आहेत. तशी वेदांच्या कर्त्यांची नावे कुणालाच, लक्षावधी वर्षांपासून ते आजतागायत ठाऊक नाहीत; कारण जर कोणी वेदांचा कर्ता असल्याचे आचार्य काशकृत्स्नी, पतंजली इत्यादींनी ऐकले असते, तर त्यांनी तसा निर्देश आपल्या ग्रंथात अवश्य केला असता. त्यांच्या सहस्त्रो वर्षांपूर्वी विद्यमान असलेल्या पुरुषांना परंपरेमुळे ती कालाची स्मृती राहिलीच असती; परंतु वेदांचा कर्ता हा अपौरुषेय असल्याने आणि त्यांना हे ठाऊक असल्याने ‘त्याचा कर्ता कोण’, हे जाणून घेण्याचा त्यांना प्रश्नच पडला नाही. वेदांत ऋषींची नावे द्रष्टे म्हणून आहेत.’

२. वेदांचा काळ
अ. मॅक्सम्युलरने मांडलेले चुकीचे गणित : ‘वेदांत भाषा विकासाच्या अवस्था आहेत. वेदांतील प्रारंभीची जी मंडले आहेत, ती भाषा अप्रगत आहे. पुढे तीच भाषा पुढच्या मंडलात प्रगत होत गेली. भाषा विकास होत गेला. एका अवस्थेनंतर भाषेची दुसरी अवस्था अस्तित्वात यायला किमान ५०० वर्षांचा काळ लागतो; म्हणून वेद वाङ्मयाचा विकास व्हायला दीड सहस्त्र वर्षे लागली’, असे गणित मॅक्सम्युलरने मांडले आहे. मॅक्सम्युलरच्या या कल्पनेचेच पुढे अन्य पाश्चात्त्य वेदाभ्यासकांत वाटप झाले. भाषाविकास, त्याच्या ठराविक मोजक्या अवस्था, या सर्व गोष्टी केवळ काल्पनिक आहेत, ही गोष्ट नंतर पाश्चात्त्य पंडितांच्या ध्यानी आली; परंतु बायबलला श्रेष्ठ ठरवण्यासाठी हा वेदकाळ निर्णय मॅक्सम्युलर इत्यादी पंडितांनी कपटाने चालू ठेवला.

आ. वेदांत ज्योतिष आहे, इतिहास आणि भूगोल आहेत. त्यांच्या आधारावरून पाश्चात्त्यांनी वेदरचनेचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केला; परंतु वेदकाळ निर्णयासाठी सरस्वती नदी महत्त्वाचे प्रमाण आहे. ‘चाळीस सहस्त्र वर्षांपूर्वी पंजाबातून वहाणारी आणि अरबी समुद्राला मिळणारी सरस्वती नदी अस्तित्वात होती’, असे पाश्चात्त्यच सांगतात अन् तिचे वर्णन वेदात आहे. वेदात गंगेपेक्षाही सरस्वतीचे माहात्म्य विपुल आलेले आहे. म्हणजेच वेद ५ सहस्त्र वर्षांपूर्वीचे नसून ते चाळीस सहस्त्र वर्षांपूर्वी अस्तित्वात होते, हे सिद्ध होते. तसेच लोकमान्य टिळकांनी त्यांच्या `ओरायन’ ग्रंथात खगोलशास्त्राच्या आधारे वेदकाळ हा ८० सहस्त्र वर्षांपूर्वीचा आहे, असे सिद्ध केले आहे.’

इ. जसे दृष्टीला संपूर्ण सागर किंवा आकाशही दिसू शकत नाही, तसे शब्दाच्या आवाक्यात वेदाचा सर्व आशय येऊ शकत नाही. यावरून ‘वेद अनादि नाहीत’, असे म्हणणे मूर्खपणाचे, म्हणजेच अल्पमतीचे द्योतक आहे.’

३. वेद हे इतिहासकालीन आहेत कि प्रागैतिहासिक आहेत, हे पाश्चात्त्य आणि त्यांच्या छायेतील भारतीय संशोधक यांना न समजणे
‘वेद हे इतिहासकालीन आहेत कि प्रागैतिहासिक आहेत, या विषयात हे पाश्चात्त्य आणि त्यांच्या छायेतील भारतीय संशोधक परस्परांचीच खरडपट्टी काढतात; कारण त्यांच्या अल्पमतीमुळे ते कोणत्याही निर्णयाला अजून पोहोचू शकलेले नाहीत अन् पोहोचू शकणारही नाहीत. त्याचे उदाहरण पुढे दिले आहे.

अ. ‘धर्मांचा विश्वकोष’ (Encyclopedia of Religion) मध्ये ‘प्राणी’ (Animals) या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात थॉमस (N .W . Thomas ) म्हणतात, `इजिप्तमध्ये गोपूजा प्रागैतिहासिक काळी होती. तशी ती भारतात नव्हती. भारतात ऐतिहासिक काळातच चालू झाली.’ तसेच क्रूक हे फोल्क्लोरे and Religion of Northen India या ग्रंथात सांगतात, `गोपूजा ही इतिहासपूर्व काळातील नाही.’ याउलट त्याच कोशात याकोबी (Jacobi) यांचा ‘गाय’ (cow ) या शीर्षकाखाली लेख आहे. ते सांगतात, `गोपूजा भारतात प्रागैतिहासिक काळीच अस्तित्वात होती. इराणी लोक आणि भारतीय लोक वेगळे होण्यापूर्वीच्या काळापासून चाललेली ही प्रथा आहे.’

टीकाकारांच्या अल्पमतीमुळे त्यांनी वेदाला काळात बांधण्याचा कसा निरर्थक प्रयत्न केला, हे वरील स्पष्टीकरणांवरून दिसून येते. वरील उदाहरणांवरून ‘वेद हे अपौरुषेय आहेत आणि ते अनादि आहेत’, हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे.’

टीका
अ. संहिता काळ वेगळा, ब्राह्मण काळ यानंतरचा, उपनिषदे आणि पुराणग्रंथ काळ नंतरचा आहे. वैदिक विचारांची धारा, वेदवाङ्मयाजवळ थांबली आणि पुढे मात्र विसंवादी, अशा पौराणिक वाङ्मयाचा काळ चालू झाला. - मॅक्सम्युलर आणि अन्य युरोपिअन टीकाकार

आ. प्रत्येक वेदाची संहिता जुनी आहे. नंतर त्या त्या वेदाचे ब्राह्मणग्रंथ आणि आरण्यके आली. - आधुनिक वेदसंशोधक

इ. `जसजसा मानव प्रगत झाला, तसतसे त्यांनी वेदमंत्रांचा विचार, अर्थ यज्ञपर लावला आणि त्यांच्यातील बुद्धीवान अन् प्रज्ञावान लोकांनी शेवटी उपनिषद आणले. थोडक्यात उपनिषदांनी वेदमंत्रांविरुद्ध बंड पुकारले.

ई. आधी पुराणे नंतर वेद !
खंडण
१. ‘आधुनिक वेदसंशोधक वेद आणि ब्राह्मणग्रंथ यांचा कालक्रम भाषेतील भेद दाखवून निश्चित करतात. इतकेच नव्हे, तर वेदांना अती अर्वाचीन ठरवण्याच्या त्यांच्या भयंकर खटाटोपात ते वेदातील काही शब्द रामायण, महाभारत आणि कालिदासाचे रघुवंशादी महाकाव्य यांच्यात आलेले दाखवून तसे संशोधन करतात.

२. उपनिषदांत जे आहे, ते वेदातील आहे किंबहुना उपनिषदात वेदातील कितीतरी सूक्ते जशीच्या तशी आलेली आहेत. सहस्त्रो वर्षांपासून वेदांचे अपौरुषेयत्व अनुभवाद्वारे आणि युक्तीवादांनी, सहस्त्रो ग्रंथांद्वारे सिद्ध झालेले आहे. पुढे वेदांचे उपबृंहण, म्हणजे वेदांचा अर्थ अधिकाधिक स्पष्ट करावा, त्याचा सामान्य माणसाला अर्थबोध व्हावा, यासाठी आमच्या पारंपरिक वेदांचे अपौरुषेयत्व ठरवणारे रामायण, महाभारत, भागवतादी पुराणे, कालिदास महाकवींचे काव्य हे सगळे ग्रंथ निर्माण झाले. याचा नीट विचार न करता वेद संस्कृतीला रानटी संस्कृती ठरवण्यासाठी हा त्यांचा सर्व खटाटोप आहे; म्हणूनच पुराव्यानीशीही त्यांना कितीही पटवून सांगितले, तरी ते या अहंगंड अशा पाश्चात्त्यांना कसे पटणार ?’

३. ‘Words of Biography’ हे मॅक्सम्युलरचे आत्मचरित्र असून त्यात तो स्वतःच म्हणतो, `वेद आधी नंतर उपनिषदे, पुराणे इत्यादी ज्या प्राचीन भारतीय वाङ्मयाविषयी मी काळ-कल्पना मांडल्या आहेत, त्या अत्यंत अशास्त्रीय आहेत. त्या केवळ तार्किक कल्पना (hypothesis) आहेत. विषय मांडण्याच्या सोयीसाठी त्या काळकल्पना आहेत. उलट त्या केवळ कल्पनाच आहेत, त्याला कसलाही शास्त्रीय आधार नाही.’

४. ‘पाश्चात्त्यांनी पुराणे नाकारली; कारण पाश्चात्त्यांच्या कालगणनेनुसार, त्यांच्या बुद्धीनुसार ‘२००० वर्षांपूर्वी (येशूपूर्वी) वाङ्मय झालेच नाही’, या त्यांच्या धारणेला धक्का बसतो. पुराणे नाकारता येत नाहीत; म्हणून त्यांनी ‘ऐतिहासिक पद्धत’ (Historical Method) प्रचारात आणून ‘पुराणे अगदी अलीकडची, म्हणजे ४००-५०० वर्र्षांतील आहेत’, असे दाखवायला प्रारंभ केला; परंतु पुराणे आणि इतिहास (रामायण अन् महाभारत) यातून आमच्या पूर्वजांनी आम्हाला व्यक्ती, कुटुंब, समाज; अखिल मानवच नव्हे, तर वृक्ष, पशू, पक्ष्यादी सृष्टी ही कशी परस्पर संबंधित आहे; सर्वांचा सहयोग घेऊन जीवन कसे उन्नत करायचे; धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थच नव्हे, तर चवथा पुरुषार्थ, मोक्ष कसा संपादन करायचा, ते शिकवले. वेद आणि पुराणे हे परस्परांशी कसे निगडित आहेत, ते दाखवले.’

धर्मग्रंथांच्या मार्गदर्शनाचे स्वरूप
‘समाजाला आपले कर्तव्य पार पाडायला तीन प्रकारे शिकवले जाते.
१. वेद (प्रभुसंमितम् ।) : ‘प्रभुसंमितम् ।’ म्हणजे ‘ईश्वराची आज्ञा.’ जशी राजाज्ञा पाळलीच पाहिजे अन्यथा शिक्षा होईल, तशी वेद जी आज्ञा देतात, शास्त्र सांगतात, ती ईश्वराची आज्ञा आहे, ते विधीनिषेध आहेत आणि ते न पाळले, तर शिक्षा होते. शास्त्राप्रमाणे वागल्यास मानवाची उन्नती होते अन्यथा अवनती होते; म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतो, ‘मीसुद्धा शास्त्र पाळतो.’

२. पुराणे (सुहृद्संमितम् ।) : ‘सुहृद्संमितम् ।’ म्हणजे ‘सुहृद (मित्र) जसा आत्मीयतेने आपल्या उन्नतीसाठी आपल्याला उपदेश करतो, मत देतो, तसा पुराणे आम्हाला सरळ सोप्या कथारूपाने उपदेश करून आचरण करायला सांगतात. योग्य आचरणाने काय पुण्य लाभते आणि योग्य आचरण न केल्यास कसे पाप लागते, हे पुराणात सांगितले आहे. पाप-पुण्याचे फलित ते सांगतात. यामुळे जीवन जगतांना कोणत्याही प्रसंगी मार्ग काढण्यास सोपे जाते.

३. काव्ये, नाटके (कांतासंमितम् ।) : ‘कांतासंमितम् ।’ म्हणजे ‘जशी पतिव्रता पत्नी पतीला वाईट वाटू न देता मोठ्या प्रेमाने हिताचा उपदेश करते, उपदेश देते, तसे कालिदास, भवभूती आदी हे आपली काव्ये, नाटके यांद्वारे समाजाला प्रत्यक्ष कथानकाद्वारे उपदेश देतात.’ नाटक हे दृश्य रूपात असल्याने त्याचा प्रभाव अधिक पडतो.’

- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’)

3 comments:

  1. लेख उत्तम आहे पण ह्यात एक महत्वाची तृती आहे कदाचित अज्ञानानेच! महर्षी दयानंद सरस्वतींचे नाव घेऊन त्यांना वेदांना अपौरुषेय न मानणारे असे दर्शविले आहे जे पूर्ण चूक आहे ! तुम्ही त्यांचे साहित्य वाचलेलं दिसत नाही. ते वेदांना सर्वोच्च्य प्रमाण मनात होते कारण ते अपौरुषेय आहेत म्हणूनच ! कृपया तेवढी दुरुस्ती करावी ही विनंती !

    ReplyDelete
  2. लेखात आणखीही काही त्रुटी आहेतच. त्यासविस्तर संवादुच ! आपणास वेदांचे अपौरुषेयत्व ह्यावर माझी एक लेखमाला आहे ती वाचावी हि विनंती !!!


    http://pakhandkhandinee.blogspot.in/2017/10/blog-post.html



    ReplyDelete
  3. आणखी काही लेख पाहावेत

    http://pakhandkhandinee.blogspot.in/2017/04/blog-post_27.html

    ReplyDelete